मुंबई : प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकहितार्थ कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस.एस.गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, यंदाचा हा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना महाराष्ट्र विभागीय शाखेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आज मंत्रालयात भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनदी अधिकारी राहुल द्विवेदी यांना नाविन्यपूर्ण कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि १० हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी खुल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री.द्विवेदी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना मशीनद्वारे सात-बाराचा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीशिवाय उपलब्ध करून दिला आहे. या अत्याधुनिक मशीनमुळे भ्रष्टाचारास आळा बसणार असून, कोणताही लेखी अर्ज न करता शेतकऱ्यांना आणि संबंधितांना सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यांनी हा प्रयोग वाशीम येथे राबविला असून, अहमदनगर येथे शासकीय महसूल कार्यालयातही एटीडीएम मशीन कार्यरत आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सन्मान भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
याचबरोबर संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेने राज्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यातील शेतकऱ्यांची दुर्दशा आणि शाश्वत विकासासाठी निवाराणात्मक उपाययोजना या विषयास प्रथम पारितोषिक कर्जतचे दिलीप जाधव यांना तर द्वितीय पारितोषिक नाशिकचे वैभव अलाई यांना प्रदान करण्यात आला आहे. अनुक्रमे ७ हजार ५०० आणि ६ हजार रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर तृतीय पारितोषिक भारताच्या विकासावर परिणाम करणारे बँकातील एनपीए या विषयास मुंबईच्या श्रीया देसाई यांना तर, उत्तेजनार्थ नाशिकचे विजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. अनुक्रमे ३ हजार ५०० आणि २ हजार रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.