Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सकाळी ११ ते दुपारी दीड यावेळेत त्यांचे पार्थिव त्यांच्या वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, किरण कुमार, महेश मांजरेकर, राज ठाकरे, विनय येडेकर, विजय कदम, आशुतोष गोवारीकर, रेणुका शहाणे, मकरंद देशपांडे आणि महेश कोठारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत  अभिनेता, सहाय्यक अभिनेता, खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिकामधल्या मधल्या समर्थ अभिनयानं चित्रपट रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. १९५० साली मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यावर ६० च्या दशकात  उमज पडेल तर, वरदक्षिणा, मोलकरीण, अपराध यासारख्या मराठी  चित्रपटातल्या भूमिकांमधून रमेश देव यांनी आघाडीच्या अभिनेत्यांमधलं स्थान पटकावलं.

दिग्दर्शक फणी मजुमदार यांचा  ‘आरती’ हा  चित्रपट रमेश देव यांनी अभिनय केलेल्या सुरुवातीच्या काळातल्या  काही हिंदी चित्रपटांपैकी एक चित्रपट. आनंद, मेरे अपने, कसौटी यासारख्या गाजलेल्या  चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या.

रमेश देव यांना जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या  ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  जीवन गौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी २८५ पेक्षा जास्त हिंदी, १९० मराठी चित्रपट तर ३० मराठी नाटकांमध्ये भूमिका केली. दूरचित्रवाणीवरच्या अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती आणि  दिग्दर्शन देखील त्यांनी केलं. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक पुरस्कारांनी रमेश देव यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रमेश देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी रमेश देव यांना आदरांजली वाहिली आहे. “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनानं मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या  हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमेश देव यांना आदरांजली वाहिली आहे. जेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्रानं  एक अत्यंत देखणा, शैलीदार अभिनेता गमावला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Exit mobile version