मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक होती. काल राज्यभरात १८ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली, ३६ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ७७ लाख ५३ हजार ५४८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७४ लाख ३३ हजार ६३३ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४२ हजार ७८४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ लाख ७३ हजार २२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ८७ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ११३ रुग्ण आढळले. यातले ४२ रुग्ण नागपुरात आढळले. मुंबई आणि ठाणे महानगरपालिका- प्रत्येकी १८, नवी मुंबई-१३, पुणे महानगरपालिका- ६, अमरावती-४, सातारा-३, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग प्रत्येकी – २, तर औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड, रायगड आणि उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात – प्रत्येकी १ रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ३३४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १ हजार ७०१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.