नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस आणि लसीची वर्धक मात्रा अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध झालं असल्यानं सर्व नागरिकांनी स्वत:ला आणि आपल्या मुलांना लस टोचवून घ्यावी, असं आवाहन बायडन यांनी नागरिकांना केलं आहे.
वर्धक मात्रेसाठी पात्र असल्यास ती मात्राही घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अमेरिकेच्या रोगनियंत्रण विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या 75% जणांनीच लशीची पहिली मात्रा घेतली असून 64 टक्केच लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
कोरोना संसर्गामुळं जगभरात आतापर्यंत 57 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वास्तवात मात्र, मृतांची प्रत्यक्ष संख्या याहून दुप्पट किंवा तिप्पट असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.