देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ६ कोटी १० लाख ९५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. आज सकाळपासून देशभरात सुमारे ४० लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे ३ लाख ३३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १५ कोटी ९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ६ कोटी ३० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर ११ लाख ९१ हजारापेक्षा पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ३८ लाख ३८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यातल्या १८ पेक्षा जास्त वयाच्या ९१ टक्के पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर १५ ते १८ वयोगटातल्या सुमारे ५५ टक्के नागरिकांना किमान एक मात्रा मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात मुंबईनं आघाडी घेतली असून त्यानंतर भंडारा, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. इथल्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. युवा वर्गाच्या लसीकरणात भंडारा, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे आघाडीवर असून इथल्या ७० टक्क्यांहून अधिक युवकांनी कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली आहे. दोन्ही मात्रा घेण्यामध्ये सांगली, रायगड, बीड, नागपूर, अमरावती, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यातले युवा कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेण्यात आघाडीवर आहेत.