पुणे : पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये 58 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदार संघ पुणे जिलह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्ह्यात 10 तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी सात मतदार संघ राखीव असून संपुर्ण विभागात 1 कोटी 90 लाख 94 हजार 159 मतदार असून त्यामध्ये 99 लाख 90 2 हजार 677 पुरुष मतदार, 91 लाख 90 हजार 990 स्त्री मतदार तर 492 तृतीयपंथी मतदार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
पुणे विभागाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, लोकसभा निवडणूकीवेळच्या मतदार यादीची तुलना करता 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदारांची 90 हजार 782 नव्याने नोंद झालेलीअसून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 24टक्के असून एकूण त्या वयोगटातील मतदारांशी तुलना करता हे प्रमाण 43.29 टक्के आहे. तसेच 20 ते 29 वयोगटातील 1 लाख 65 हजार 72 नव मतदारांची नोंद झाली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 4.60 टक्के इतकी आहे.
पुणे विभागात 98.51 टक्के मतदारांना फोटो ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मतदान यादीत नाव आहे मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र नाही ते निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतात. पुणे विभागाचा मतदार यादीचा पुरुष-स्त्री प्रमाण 935 आहे.
नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा अंतिम दिनांक 4आक्टोबर असून मतदारांना मतदार यादीमध्ये आवश्यक ते बदलाचे सर्व फॉर्म क्र. 6, 6अ, 7, 8 व 8अ हे या तारखेपूर्वी 10 दिवस अगोदरपर्यंत जमा करता येतील. या तारखेपर्यंत जमा झालेले अर्ज समावेशनासाठी पात्र राहतील. त्यानंतरच्या अर्जावर नंतर निर्णय घेतला जाईल.
पुणे विभागात एकूण 10 हजार 266 मतदान स्थळे (PSL) असून एकूण 20 हजार 198 मतदान केंद्रे (PS) आहेत.
त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 922, सातारा जिल्ह्यात 2 हजार 978, सांगली जिल्ह्यात 2 हजार 435, कोल्हापूर जिल्ह्यात 3 हजार 342 तर सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 521 मतदान केंद्रे आहेत.
पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतर
पुणे जिल्हयातील 1 हजार 11 पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्रांपैकी एकूण 890 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. पक्क्या इमारतीत 480 व तात्पुरत्या स्वरुपातील शेडमध्ये 410 मतदान केंद्रे स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. तसेच फक्त 121 मतदान केंद्रे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अद्यापी असून त्यांना लिफ्टची सोय आहे. सदर ठिकाणी दिव्यांग व वयस्कर मतदारांना लिफ्टचा वापर करण्याबाबतचे नियोजन आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 7 व सोलापूर जिल्ह्यातील 2 पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे.
पुणे विभागात विधानसभा मतदार संघ निहाय सर्व 58 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधान सभा मतदार संघात किमान 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पूरग्रस्त बाधीत भागातील मतदान केंद्रे यांचे काही ठिकाणी नुकसान झाले असून ती नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 61 पूराने बाधीत झालेली 47, तळमजल्यावर स्थलांतरीत 7 व इतर कारणांमुळे 7, सांगली जिल्ह्यात 40 पैकी पूराने बाधीत झालेली 37 व सातारा जिल्ह्यात 35 मतदार केंद्रांचा समावेश आहे. सदर स्थलांतराला आयोगाकडून मंजूरीनंतर मतदारांना नवीन ठिकाणांची माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी 1 लाख 18 हजार 515 इतके अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तसेच एकूण 1 लाख 40 हजार 362 अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच विविध कामांसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागात 1 हजार 207 व्हिडिओग्राफर्स, 887 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. 264 भरारी पथके, 278 एसएसटी म्हणजेच स्थीर पथके, 189 व्हिडिओ सर्व्हायलन्स पथके आणि 70 व्हिडिओ पाहणी पथके तर 73 लेखापथके नियुक्त करण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जातील.
सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा AMF देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रॅम्प, पाणी, फर्निचर, वीज, प्रसाधन गृह, सायनेजेस (फलक), शेड, मदतकेंद्र, पाळणाघर यांचा समावेश आहे.
पुणे विभागात एकूण 1 लाख 28 हजार 518 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आलेली असून लोकसभेशी तुलना करता (94,292) 34,226 ने वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. तसेच अपंग कल्याण आयुक्तालयाकडून, दिव्यांग व्यक्तींची सांख्यिकीय माहिती प्राप्त करुन सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. विभागात एकूण मतदान स्थळे (PSL) 10 हजार 266 असून आजअखेर व्हिल चेअरची उपलब्धता 8 हजार 110 आहे. तसेच प्रत्येक मतदार स्थळावर किमान 1 व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांना मदतीसाठी 17 हजार 852 स्वयंसेवक उपलब्ध आहेत. तसेच त्यांना विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा (AMF) उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. तसेच गरजेनुरुप वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत सी-व्हिजिल या नव्या मोबाईल ॲपची निर्मिती भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करु शकतात. तसेच 1800111950 किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1950 या क्रमांकावर राष्ट्रीय संपर्क केंद्राला फोन कॉल करु शकतात. नागरिक NGRS व्दारे ही तक्रार दाखल करु शकतात.
शस्त्र परवान्याबाबत छाननी करुन जी शस्त्रे जमा करणे आवश्यक असतील, ती जमा करुन घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. अवैध मद्यविक्री, वाहतूक यावर छापे टाकून जप्त करणे त्याचप्रमाणे परवानाधारक मद्य विक्री दुकानांमधून विकल्या जाणाऱ्या मद्याच्या खपावर लक्ष ठेवणे तसेच ज्या ठिकाणी खप जादा होत असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी आणि तत्पूर्वी 48 तास आधी ड्राय डे म्हणून घोषित केला जातो. निवडणूक संबंधी विविध गुन्हयांसाठी आयपीसी मधील कलम 171 व त्यातील पोट कलमांतर्गत गुन्हे दाखल करणे. संवेदनशील क्षेत्रामध्ये सीआरपीएफ व पोलीसांचे संचलन करणे. विविध भरारी पथके व स्थिर पथकांमार्फत निवडणूक काळातील अवैध पैसे, दारु, शस्त्र वाहतुकीची तपासणी करुन नियंत्रण आणणे. सीआरपीसीच्या कलम 107, 108, 109, 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, बंधपत्र (बाँड) घेणे. अवैध शस्त्र साठा /स्फोटके जप्त करणे. अवैध शस्त्र निर्मिती ठिकाणावर छापे घालून जप्ती करणे. परवानाधारक शस्त्र जमा करण्याकरीता समितीच्या सल्ल्याने शस्त्र परवाने जमा करुन घेणे. शस्त्र जमा करुन घेणे किंवा परवाने रद्द करणे इ. अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करणे. व्हलनरेबल वाडी/ पाडे/ पॉकेट इत्यादी निश्चित करणे, त्या ठिकाणच्या मतदारांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी अशा ठिकाणांना भेटी देणे. संवेदनशील- (Vulunareble) / गंभीर – (Critical)
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागात मतदार संघ निहाय आचार संहिता अंमलबजावणी कक्ष, जिल्हा संपर्क कक्ष, मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, माध्यम समन्वय कक्ष असे कक्ष स्थापन करुन या कक्षांमार्फत निवडणूकीचे काम नियोजनबध्द पाडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम
1)निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणेचा दिनांक 27/09/2019 (शुक्रवार)
2)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 04/10/2019 (शुक्रवार)
3)नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 05/10/2019 (शनिवार)
4)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 07/10/2019 (सोमवार)
5)मतदानाचा दिनांक 21/10/2019 (सोमवार)
6)मतमोजणी दिनांक 24/10/2019. (गुरुवार).
7)निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/10/2019 (रविवार).
मतदान ओळखपत्र नसेल तर…
1) पासपोर्ट,
2) वाहन चालक परवाना
3) केंद्र/ राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र
4) बँक/ पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक
5) पॅन कार्ड
6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
7) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड
8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
9) फोटोसह पेंशन दस्तऐवज
10) खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
11) आधार कार्ड