देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होती देशात काल ६७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात या आजारातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४ कोटी १९ लाख १० हजार झाली आहे. देशात काल ३० हजार ७५७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या देशात ३ लाख ३२ हजार ९१८ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३ शतांश टक्के झालं आहे. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात १७४ कोटी ३५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ७६ कोटी ४३ लाख नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर १ कोटी ७३ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ७ कोटी १६ लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून १७ लाख ७३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.