Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : ई कॉशेस मोबिलिटी  इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक  वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली.

तळेगाव एमआयडीसी येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, उद्योग समूहाचे अध्यक्ष पीटर केन्झ, संस्थापक राम तुलुमूरी, संचालक रवी पंगा उपस्थित होते.

ई कॉशेस मोबिलिटी  या यूकेच्या उद्योग समूहाने महाराष्ट्र राज्याची गुंतवणुकीसाठी निवड केली, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, राज्य शासनाने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केले आहे.  इलेक्ट्रिक वाहने निर्मिती, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन सातत्याने प्रोत्साहन देत आहे.  इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या  उद्योग, संस्थांना पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरण चांगले असल्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहे. या धोरणामुळेच राज्यात गुंतवणूक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकल्पांना शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version