चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
Ekach Dheya
मुंबई : चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) यांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले.
चाकण औद्योगिक वसाहत व पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, या योजनेच्या औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. तर पाणीपट्टी वसुली, चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) मार्फत करण्यात येते. योजनेचे संकल्पित वर्ष हे २०२१ असून लाभार्थी गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. या योजनेचा संकल्पन कालावधी पूर्ण झाला असल्याने सुधारित योजनेनुसार समाविष्ट गावांना सध्याचा लोकसंख्येचा दाखला व योजनेत समाविष्ट होण्यास इच्छुक असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्यानंतर सुधारीत योजनेबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस आमदार दिलीप मोहीते पाटील, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.