Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख (फ्लाय ॲश) टाकली जात होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेऊन ही राख टाकणे बंद करण्याबरोबरच टाकलेली राख तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील राख उचलण्याचे काम सुरू असून, या राखेमुळे बाधित रहिवाशांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, महाजेनकोचे श्री. खंदारे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री.घुगे, राख विसर्जन तलाव बाधितांचे प्रतिनिधी जागेश्वर पुऱ्हे, ‘असर’ संस्थेचे बद्री चॅटर्जी आदी उपस्थित होते. आमदार श्री.जैस्वाल यांनी प्रकल्पबाधितांच्या समस्या सोडविण्याबाबत पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांना विनंती केली.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यासंदर्भात ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत नांदगाव परिसरातील बाधितांच्या समस्यांबाबत तसेच इतरही गावांत असे बाधित असतील तर त्यांनाही रोजगार मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडून प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला मिळावा याबाबत चर्चा करण्यात येईल. नांदगाव येथील बाधित जमिनीवर भविष्यात सोलर पॅनल, हरीत उद्यान यासारखे अन्य पर्यावरणपूरक प्रकल्प राबविता येतील का याबाबत अभ्यास करण्याचे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.

Exit mobile version