Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी आशीर्वादानं आपल्याला नीतिमत्ता, एकता, शांती आणि समृध्दीच्या मार्गावर नेतील, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थनेसाठी भाविक मोठ्या संख्येनं येत असून, प्रयागराजमधल्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. दिल्लीमध्ये देखील मंदिरं सजली असून लोक शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून लांबच लांब रांगा लावून प्रार्थना करत आहेत.

राज्यातही आज सर्वत्र महाशिवरात्र भक्तिभावानं साजरी केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथलं घृष्णेश्वर मंदीर, बीड जिल्ह्यात परळी इथलं वैजनाथ मंदीर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीराच्या गाभाऱ्यात, भाविकांना दर्शन घेता येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळ तसंच महापुरुषांचे पुतळे, आदि ठिकाणी जवळून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायला परवानगी दिली आहे.

Exit mobile version