नवी दिल्ली : भारतातील एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भांडवल, उद्योग उभारणी आणि ऊर्जा या वरील खर्च कमी करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 16 व्या जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शिखर परिषदेचे उद्घाटन नवी दिल्लीत गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
दरवर्षी एमएसएमई आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले जाते. यंदाच्या परिषदेची संकल्पना ‘भारतीय एमएसएमई क्षेत्राला जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक बनवणे’ ही आहे. देशातल्या एमएसएमई क्षेत्रात विकासाला गती देण्याची आणि रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. मात्र त्यासाठी देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक तसेच या क्षेत्रांमधल्या विविध घटकांमध्ये समन्वयाची गरज आहे असे ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेतल्या कृषी आधारित उद्योगांना शहरी उद्योगांसोबतच चालना देऊन एकात्मिक विकास घडवण्याला सरकारचे प्राधान्य आहे. मध, बांबू, वस्त्रोद्योग, जैव इंधन, जलवाहतूक, मत्स्य व्यवसाय अशा उद्योगांसाठी ग्रामीण भागात वाव आहे तर मोठ्या उद्योग कंपन्यांना लागणारे सुटे भाग बनवण्याच्या छोट्या कारखान्यांना शहरी भागात वाव आहे. या दोन्ही क्षेत्रात गुंतवणूक करावी असे आवाहन गडकरी यांनी केले.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सध्या एमएसएमईचा वाटा 29 टक्के आहे. येत्या पाच वर्षात तो 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उदिृष्ट आहे तर निर्यात 60 टक्यांपर्यंत वाढवायची आहे. हे उदिृष्ट साध्य करण्यासाठी भांडवल, ऊर्जा आणि निर्मितीचा खर्च कमी करायला हवा असे ते म्हणाले.
15 पेक्षा जास्त देशांमध्ये 500 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.