मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्याची कार्यवाही केली जाईल.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्ह्यातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे दस्तऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली मतदार ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.