Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं आज वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय मिळवला. हॅमिल्टन इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतानं, निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ गडी बाद ३१७ धावा केल्या.

स्मृती मंधाना हिनं १२३ तर हरमनप्रीत कौर हीनं १०७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यू आणि देंद्र डॉटीन यांनी, धडाकेबाज फलंदाजी करत, अवघ्या १२ षटकात शतकी सलामी दिली. स्नेह राणा हीनं डॉटीनला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मात्र वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ ४० षटकं आणि ३ चेंडूंमध्ये केवळ १६२ धावांमध्येच माघारी परतला.

भारताच्या वतीनं स्नेह राणा हीनं ३, मेघना सिंग हीनं २, तर झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. शतकवीर स्मृती मंधाना हिला सामनवीर पुरस्कारानं गौरवलं गेलं. स्पर्धेत भारताचा यापुढचा सामना येत्या १६ मार्चला इंग्लंडसोबत होणार आहे.

Exit mobile version