Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडनवीस यांचा फक्त जबाब नोंदवला असल्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस बदली अहवाल फुटल्या प्रकरणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची मुंबई पोलिसांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुमारे दोन तास चौकशी केली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. त्यावेळी फडनवीस यांच्या घरी तलेरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते, कार्यकर्त्यांनी  गर्दी केली होती. या चौकशीच्या निषेधार्थ मुंबईसह राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र, फडनवीस यांचा फक्त जबाब नोंदवला असून त्यावर गदारोळ करण्याचं कारण नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. विशेष तपास पथकाकडची माहिती बाहेर कशी गेली, याबाबत चौकशी सुरु आहे.माहिती तंत्रज्ञान कायदा, शासकिय गोपनियता कायदा अशा विविध कायद्याअंतर्गत या प्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फक्त माहिती घेण्यासाठी फडनवीस यांना नोटिस पाठवली आहे. याआधी त्यांना पाच ते सहा वेळा नोटीस पाठवली होती. त्यात त्यांना बोलावलं नव्हत. फक्त प्रश्नावली पाठवली होती. त्यावर त्यांनी फक्त एकदा आपण लवकरच माहिती देऊ, असं कळवलं होतं. मात्र ती अद्याप दिली नाही. म्हणून पोलिसांनी आज त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. यात गैर काही नाही, असं वळसे पाटील म्हणाले. तर, याप्रकरणी विधानसभेत आपण आवाज उठवल्यामुळेच अचानक ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप फडनवीस यांनी नंतर वार्ताहर परिषदेत केला. राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. याची सगळी माहिती मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर उच्च न्यायालयानं या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवला. त्यावर सर्वोच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केले. याचा अर्थ हा घोटाळा घडलाय, असा दावा फडनवीस यांनी केला. चौकशीच्या निमित्तानं आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तो यशस्वी हाणार नाही, असं ते म्हणाले.

Exit mobile version