Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं विधानसभेत निवेदन

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग होता, असं गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितलं. विरोधी पक्षानं सभागृहात प्रश्न मांडल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी नेमली होती, त्यामध्ये २४ जणांचे जबाब नोंदवले गेले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास पूर्ण करायचा असेल, तर त्याच्याशी संबंधित सर्वांचे जबाब नोंदवावे लागतात, असं गृहमंत्री म्हणाले. विरोधी पक्ष नेत्यांच्या विशेषाधिकाराचं हनन करण्याचा कोणताही विचार नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा विषय इथंच थांबवावा, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, आपल्याला विचारलेले प्रश्न हे एखाद्या आरोपीला विचारले जाणारे प्रश्न होते, असा आरोप फडनवीस यांनी केला. तर, याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर हक्कभंग दाखल करावा, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडताना ते बोलत होते. विशेषाधिकार असतानाही पोलिस फडनवीस यांच्या घरी कसे काय गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात वीज जोडणी आणि भारनियमनाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगत, भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी, या मुद्यावर चर्चेची मागणी केली. वीज जोडणी तोडण्याबात शासनाची नक्की भूमिका काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग कामगारांचा वीजपुरवठा बंद केल्याचा मुद्दा आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितलं.

Exit mobile version