नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी येत्या २५ मार्चपासून गावोगावी शिबीर घेतलं जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातल्या अंदाजे ५० हजार २०४ शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यानं ते ह्या योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकर्यांरच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आवश्यक माहिती देण्यासाठी प्रत्येक गावचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या शिबिराला उपस्थित राहतील. तसंच ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा निधी मिळत नाही त्यांची यादी संबंधित कर्मचाऱ्यांना देतील. संबंधित शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, बँकेचं पासबुक, आधारकार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.