‘आरे’ मधील अतिक्रमण काढताना विविध विभागांनी समन्वयाने काम करावे – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार
Ekach Dheya
मुंबई : आरे वसाहतीमधील एकूण 12 संवेदनशील ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे. पुन्हा अतिक्रमणे होवू नये यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी संबंधितांना दिले.
मंत्रालयात ‘आरे’ वसाहतीमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त एचपी तुम्मोड, पोलीस उपायुक्त शिवाजी राठोड, सोमनाथ घोरगे, पोलीस निरीक्षक तानाजी खाडे, शिधावाटप अधिकारी दीपक पवार, गणेश बेल्लाळे तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते .
पोलीस आणि सुरक्षा विभागाने सतर्क रहावे
श्री.केदार यांनी आरे दूध वसाहत मधील अतिक्रमण विषयी सविस्तर आढावा घेऊन संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा विभाग यांनी केलेल्या कारवाईची माहिती घेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
‘आरे’ मध्ये पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा
आरे वसाहतीमधील गेट क्रमांक दोन येथील गोदाम क्रमांक तीन या कंपनीच्या ताब्यात असलेल्या गोदामात अवैधरित्या रेशनिंगचे धान्य ठेवून काळाबाजार होत असल्याच्या माहितीवरून आरे प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. या प्रकरणी अन्न व नागरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून नोंद करण्यात आले आहे तसेच हे गोदाम संयुक्तरित्या सीलबंद करून कार्यालयाचा ताबा घेण्यात आलेला आहे.
अदानी शर्तभंग कारवाई करून जागा कंपनीकडून काढून जमा करावी
‘आरे’ वसाहतीमधील मे. अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड यांच्या ताब्यात असलेल्या जागेसंदर्भात शर्तभंग झाली असल्याने त्यावर कारवाई करून ही जागा कंपनीकडून काढून घेऊन जमा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तबेल्यांमधील खिळ्यांची संख्या वाढवावी
आरे दुग्धव्यवसायातील अस्तित्वात असलेल्या तबेल्यांमधील खिळ्यांची संख्या वाढविण्याबाबत श्री.केदार यांनी सांगितले की, परिसरात उपलब्ध तबेले व सुविधांचा विचार घेऊन जास्त पशुधन सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासणी करून ती वाढविण्यात यावी.