मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
चारा आणि पाण्यावाचून जनावारांची उपासमार होत असल्याने शेतकऱ्यांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्याचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळग्रस्त १० जिल्ह्यंमधील १४३७ छावण्यांमध्ये १० लाख जनावारे दाखल झाली आहेत.
आणखी हजारो जनावरे चारा छावण्यांमध्ये दाखल होतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने दिली.
दिवसेंदिवस तीव्र होत जाणाऱ्या उन्हामुळे पाणीसाठे आटू लागले आहेत. शेकडो गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आजमितीस चार हजार ५४७ गावे आणि नऊ हजार ९७३ पाडय़ांमध्ये नऊ हजार ७९७ टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद जिल्ह्य़ात ११०७, जालन्यात ६२३ आणि बीडमध्ये ८८७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जनावारांसाठी छावण्यांची संख्या वाढवण्याची मागणीही होत आहे. आतापर्यंत अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्य़ांत १४३७ छावण्या सुरू करण्यात आल्या असून तेथे नऊ लाख ६५ हजार ४७४ जनावारे ठेवण्यात आली आहेत. अहमदनगरमध्ये ५०१, बीडमध्ये ५९९, सोलापूरला १७४ छावण्या सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.