Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशा सूचना दिल्या आहेत. मतदान २१ ऑक्टोबर रोजी आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

संबंधित नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे. सर्व संबंधित घाऊक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांना या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित अनुज्ञप्तीधारक या निर्देशाचे कडक पालन करतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच आवश्यकता असल्यास संशयित अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्त्या मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर सीलबंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. निवडणुकीचे कोरडे दिवस हे सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य विक्रेते अनुज्ञप्तीधारकांना लागू आहेत. तसेच विशेष कार्यक्रमासाठी देण्यात येणाऱ्या एक दिवसीय अनुज्ञप्तींसाठीसुद्धा हे कोरडे दिवस लागू आहेत. निवडणुकी दरम्यानच्या या कोरड्या दिवसांना कोणत्याही अनुज्ञप्तीधारकास कोणत्याही बाबीसाठी सवलत नाही, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त तसेच अधीक्षक यांना दिल्या आहेत.

Exit mobile version