पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध – अजित पवार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. जीर्ण झालेल्या राज्यातल्या ७५ पोलीस ठाण्याचं बांधकाम करण्यात येईल. तसंच पोलीसांच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना ८६० कोटी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. शिर्डी शहर आणि परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचं बळकटीकरण होणं गरजेचं आहे.
यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील, असंही ते म्हणाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.