Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती मिडीया सर्टीफीकेशन अँँण्‍ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मिडीया, टी.व्ही.चॅनेल, रेडीओ, केबल्स व वर्तमानपत्राव्दारे देण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे. जाहिरातींना परवानगी देणे, एखादी बातमी प्रदत्‍त वृत्‍त (पेड न्यूज) आहे का हे तपासून उचित कारवाई करणे आदी कामे ही समिती करणार आहे.

या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम असून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड हे नोडल अधिकारी आहेत.  जिल्‍ह्यातील 21 मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी संजय कर्णिक, पुणे शासकीय तंत्र निकेतनचे (संगणक) अधिव्याख्याता टी.पी. शर्मा, एस.बी.निकम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सोशल मिडीया विशेष शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शामल पाटील-पोवार, पोलीस कॉन्‍सटेबल अविनाश लोहार हे सदस्‍य आहेत तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे काम पहाणार आहेत.

माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज – टीव्‍ही चॅनेल, रेडीओ एफएम, आकाशवाणी, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्‍तपत्रांच्‍या इ-आवृत्‍तीतील (जाहिराती)  सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्‍या दृक-श्राव्‍य (ऑडिओ –व्‍हीज्‍यूअल) जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्‍यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज (इंग्रजी किंवा मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्‍ये आवश्‍यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी ( सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्‍या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती-ट्रान्‍सस्‍क्रीप्‍ट) जिल्‍हा माहिती कार्यालय, तळमजला, नवीन मध्‍यवर्ती इमारत, ससून हॉस्‍पीटल कॉर्नर, पुणे ( दूरध्‍वनी  – 020 26122302) येथील जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्‍या कक्षात आणून देणे आवश्‍यक आहे. राजकीय पक्षांच्‍या जाहिराती राज्‍यस्‍तरावरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्‍या जातील. त्‍यासाठी मुंबई येथील समितीशी थेट संपर्क साधावा. पुणे जिल्‍ह्यातील विधानसभेचे उमेदवार अथवा त्‍यांचे प्रतिनिधी जिल्‍हा समितीकडे अर्ज सादर करु शकतात. फक्‍त उमेदवाराच्‍या वैयक्तिक सोशल मिडीयाच्‍या अकाऊंटवरील पोस्‍ट, फोटो, व्हिडीओ यांच्‍यासाठी प्रमाणपत्राची गरज नाही.

प्रत्‍येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडिओ-व्‍हीज्‍यूअल जाहिरात ही स्‍वतंत्र असावी. एकाच सीडीमध्‍ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्‍ता, जाहिरात कोणत्‍या उमेदवारासाठी आहे त्‍याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरातीतील भाषा याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख असावा. मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी 3 (तीन) दिवस आणि इतर जाहिरात प्रसारणापूर्वी 7 (सात) दिवस अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्‍य असावा. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींमध्‍ये, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. देशविघातक कृत्‍याला प्रोत्‍साहन देणारा नसावा. मुद्रीत माध्‍यमातील (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी किंवा मतदानाच्‍या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाची असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक आहे.

Exit mobile version