सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Ekach Dheya
मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला.
पोलीस दलाच्या विविध क्षेत्रातील विशेष कामगिरीबाबत समाधान व्यक्त करून गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भविष्यात यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल. एकूणच कामकाज करतांना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे. सामान्यांचे समाधान हे सर्वात महत्वाचे आहे. सामान्य माणूस पोलीस दलाबद्दल काय विचार करतो यावर पोलीसदलाची प्रतिमा अवलंबून असतें.
पोलिसिंग करतांना निःस्वार्थीपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यामध्ये वेगवान तपास करुन आश्वासक कामगिरी केली पाहिजे असेही ते म्हणाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक वातावरण आणि शांतता धोक्यात येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. राज्याच्या विविध भागात गुन्हेगारीचे स्वरूप वेगवेगळे आहे. औद्योगिक क्षेत्रातील अशांतता, अवैध धंदे, महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावरील अन्याय अत्याचार हे महत्वाचे विषय असून त्यावर प्राधान्याने कारवाई करावी. पारदर्शी व प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून पोलिसांची सकारात्मक प्रतिमा उंचावण्याबरोबरच पोलिसांचा दरारा निर्माण करावा असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
राज्य पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व सुविधा, आधुनिक सामग्री देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विविध पोलीस घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी प्राप्त अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले. कायदा व सुव्यस्थेबाबत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर सादरीकरण केले.