Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी  घेतला आढावा

मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मूल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच राष्ट्रपती भवन येथे देशातील सर्व राज्यपालांची परिषद होणार आहे. या राज्यपाल परिषदेमध्ये विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. यादृष्टीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील सर्व अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे आयोजित केली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, रुसाचे संचालक पंकजकुमार,अकृषी, कृषी,आरोग्य आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, उत्तम विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी महाराष्ट्राची ओळख तयार करताना प्रत्येक कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठाचा दर्जा सर्वच क्षेत्रात उंचावण्यासाठी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या शरीरासाठी दैनंदिन जीवनात योग करण्यासाठी प्रवृत्त करणे, फिट इंडिया अभियान राबविण्यात पुढाकार घेणे, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

अकृषी विद्यापीठांचा आढावा घेताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. असे करीत असताना मनरेगाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शेतीला समाविष्ट करणे आवश्यक असेल. असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

प्रस्तावित नवे शैक्षणिक धोरण, विद्यापीठातील प्रशासनात आवश्यक असणाऱ्या सुधारणा, गुणवत्ता सुधार, संशोधन आणि नाविन्यता, डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम, अध्यापकांच्या रिक्त जागा भरणे, महाविद्यालयांचे नॅककडून राष्ट्रीय मूल्यांकन, विद्यापीठांना देण्यात येत असलेली स्वायत्तता, रुसाअंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी यासह विविध विषयांवर उपस्थित कुलगुरु यांनी आपली मते मांडली.

याच बैठकीत उच्च शिक्षणात येत्या काळातील अपेक्षित गुणवत्ता सुधार, डिजिटल ग्रंथालये, ई -लायब्ररी, स्मार्ट वर्ग, कौशल्ययुक्त शिक्षण, योगचा अभ्यासक्रमात सहभाग, तर फिट इंडिया अभियान आणि उन्नत भारत अभियानाची अंमलबजावणी या बाबतही याबैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी यावेळी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत सादरीकरण केले. तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विद्यापीठा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सुधारणा याविषयीची माहिती दिली. सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठांचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा करता येईल याबाबतच्या सुधारणा यावेळी सुचविल्या.

Exit mobile version