कोरोना निर्बंध हटवल्यामुळे राज्यात बाबासाहेबांची जयंती होतेय उत्साहात साजरी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, की डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावं लागेल. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. त्यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सूत्रांविषयी जागरूक राहावं लागेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. देशाची राज्यघटना, एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असं आवाहन करीत त्यांनी सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.