चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते – प्रधानमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमधे भूज इथलं के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालय, राष्ट्राला समर्पित करताना बोलत होते.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे, तसंच सर्वांना वैद्यकीय शिक्षण देणं शक्य व्हावं, यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर येत्या दहा वर्षात भारतात विक्रमी संख्येनं डॉक्टर्स तयार होतील, असं ते म्हणाले.
आयुष्मान भारत योजना आणि जनऔषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे उपचारांवर होणारे हजारो कोटी रुपये वाचले असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व आरोग्य सुविधांनीयुक्त असं हे रुग्णालय भूजवासियांना परवडेल अश्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. स्वस्त आणि उत्तम उपचार पद्धतीमुळे लोकांचा आरोग्य व्यवस्थेवर विश्वास वाढतो असं ते म्हणाले.
भूज इथल्या श्री कच्छी लेवा पटेल समाजानं हे रुग्णालय बांधलं असून, कच्छ परिसरातील हे पहिलेचं धर्मादाय सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयात इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, कॅथलॅब, कार्डिओथोरासिक शस्त्रक्रिया, तसंच कर्करोगविषयक सेवा, नेफरोलॉजी, युरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसीन, न्यूरो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट आणि इतर सहायक सेवा उपलब्ध असतील.