मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन दिवसात ही मार्गदर्शक तत्वं जारी केली जातील, असं ते म्हणाले.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी याकडे आमचं लक्ष असून, राज्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, नाशिकमध्ये कुठलेही भोंगे लावण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही ३ मे पर्यंत परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून भोंगे काढले जातील, असे आदेश नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी जारी केले आहेत.
सर्वच प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत आहे, त्यानंतर जिथे परवानगी नाही तिथे पोलिस जप्तीची कारवाई करतील, तसंच सर्व ठिकाणी ध्वनि प्रदूषणाची मर्यादा पाळणं बंधनकारक असणार आहे. नागपूरमध्येही पोलिसांनी अशाचप्रकारचे आदेश जारी केले आहेत.