मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेतला जावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज बैठकीत घेतला.
पुढची काही शतके लोक या युगातील काम आणि वैशिष्ट्ये पाहू शकतील अशा लेण्या निर्माण करण्याच्यादृष्टीने योग्य स्थळे, शिल्पकार, त्या स्थळांचा भौगोलिक अभ्यास करून एक उत्तम संकल्पचित्र सादर करण्याचे आदेशही त्यांनी आज दिले.
मंदिरे, गड-किल्ले आणि संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनाचे काम करतांना त्यांचं मूळ रुप, स्थान महात्म्य आणि इतिहास लक्षात घेऊन हे काम शास्त्रीय पद्धतीने आणि कालबद्ध रीतीने करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यामध्ये प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेणी खोदणे, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड- किल्ल्यांचे संवर्धन इ. विषयांचा समावेश होता. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख, इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातल्या ८ मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाचं काम करण्यात येणार असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील धुतपापेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर, पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी, नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील खंडोबा, बीड जिल्ह्यातील भगवान पुरुषोत्तम, अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिवमंदिराचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग व सिंधुदर्ग या सहा गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.