पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे या दोघांनीही बुधवारी (दि. २) पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दोघांनीही उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचाराच्या नियोजनाबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत जगताप आणि लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष कार्यकर्त्यांनी कमळ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी जोमाने कामाला सुरूवात करावी, असे आवाहन जगताप आणि लांडगे यांनी केले.
दरम्यान, बैठकीपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून, तर आमदार महेश लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोघांनीही बुधवारी सकाळी पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. तसेच जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीसंदर्भात सर्वांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी खासदार अमर साबळे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत तापकीर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, उमा खापरे, राजेश पिल्ले, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात, बाबू नायर, भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब जवळकर, विजय फुगे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप हे गुरूवारी (दि. ३), आमदार लांडगे हे शुक्रवारी (दि. ४) निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भारणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निवडणूक प्रचाराची रणनिती आणि नियोजनाबाबत दोघांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांना पक्षाने दिलेल्या उमेदवारीचे स्वागत केले. दोघांनाही मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आमदार जगताप व लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणूक प्रचारात कमळ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी जोमाने कामाला सुरूवात करावी, असे आवाहन केले.