मुंबई : शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत; तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेसंदर्भात प्रशासकीय विभागांची कार्यशाळा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असताना काय करावे आणि काय करु नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सुरू असलेले उपक्रम, योजना सुरू ठेवता येतील; तथापि, नव्याने सुरू करता येणार नाहीत. आपत्तीच्या प्रसंगी व पुनर्वसन कार्याबाबत प्रचलित नियमानुसार मदतकार्य करता येईल, असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या 27 ऑक्टोबर या दिवसापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय तसेच अधिनस्त कार्यालये,महामंडळांच्या संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे त्यांचे संदेश तसेच प्रसिद्धीपत्रके काढून टाकण्यात आल्याबाबत खात्री करावी.
शासकीय इमारतींवर कोणत्याही प्रकारचे राजकीय प्रचारसाहित्य लावलेले नाही याची खात्री करुन घ्यावी. अद्यापही कार्यवाही झालेली नसल्यास ते काढून टाकण्यासह गुन्हा दाखल करावा. तसेच शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण, ध्वनिक्षेपकांचा वापर, शासकीय वाहनांचा वापर, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे, सभांचे चित्रीकरण, निवडणूक आयोगाकडून विकसित केलेले ‘सी-व्हिजिल’ ॲपवर येणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद देणे आदी बाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह विविध मंत्रालयीन विभागांचे सहसचिव, उपसचिव उपस्थित होते.