महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
Ekach Dheya
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच राज्यातील नागरिकांना मराठीतून संबोधित केले.
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पांडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल; महाराष्ट्र पोलीस, बृहन्मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस बल व मुंबई अग्निशमन दल यांच्या निशाण टोळ्या, मुंबई लोकमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बंद वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले.
संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती.
राज्यपालांचे संगीत कला अकादमीला २५ हजार रुपयांचे बक्षीस
मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला.
यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीला 25 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, माजी मंत्री दिवाकर रावते, आमदार सदानंद सरवणकर, आमदार सुनील शिंदे, आयुक्त इकबाल सिंह चहल, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.