Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी आपल्या योगदानानं महाराष्ट्राबरोबरच देशालाही समृद्ध केलं आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे, असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं आहे.आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रपतींनी गुजरातमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमधल्या कठोर मेहनत घेणाऱ्या लोकांनी उद्योजकांनी गुजरात आणि भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्याची प्रगती अशीच सुरु राहावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू यांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त दोन्ही राज्यांमधल्या  जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, निसर्ग-सौंदर्य आणि संस्कृतीनं देशाच्या विकासात महत्वाची भूमीका बजावली आहे, असं नायडू यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान अतुलनिय आहे. राज्यातल्या लोकांनीही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या समृद्धीची कामना त्यांनी व्यक्त केली आहे. गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त मोदी यांनी गुजरातमधल्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या आहेत. महात्मा गांधी, सरदार पटेल आणि इतर अनेक महापुरुषांच्या आदर्शानं प्रेरित झालेल्या गुजरातमधले लोक विविध क्षेत्रांमधल्या त्यांच्या कामगिरीमुळे ओळखले जातात, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version