प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
राज्यातल्या प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, मात्र आवाजाची मर्यादा ओलांडू नये, असं ते यावेळी म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे जनतेचं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, ओबीसींना आरक्षण मिळावं अशी सरकारची भूमिका असून, याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.