कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल खेळांच्या राज्यस्तरावरील स्पर्धांच्या बक्षिसांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार- उपमुख्यमंत्री
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ७५ लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढच्या वर्षीपासून १ कोटी रुपयांपर्यंत केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल इस्लामपूर इथं लोकनेते राजारामबापू क्रिडानगरी पोलीस परेड मैदानावर आयोजित २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात विभाग स्तरावरच्या क्रिडा संकुलासाठी ५० कोटी, जिल्हास्तरावरच्या क्रिडा संकुलासाठी २५ कोटी, तालुका क्रिडा संकुलासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील, असं ते म्हणाले. राज्यातल्या खेळाडूचं हीत जपण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ग एक आणि वर्ग दोनच्या नोकऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार सरकार देत आहे, असं त्यांनी सांगितलं. विविध खेळांमध्ये प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांनी योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ देणं आवश्यक आहे, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.