बीडीडी चाळीतली घरं बांधकामाच्या किंमतीत पोलिसांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींमध्ये २०११ च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दरानं ही घरं देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ते वर्षा निवासस्थानी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. बीडीडी चाळीत अनेक वर्षांपासून लोक राहत आहेत. या चाळींचा पुनर्विकास ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र, पुनर्विकास करताना स्थानिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. या भागात उपलब्ध असलेल्या इतर घरांच्या बाजार भावाच्या किंमतींपेक्षा कमी दरानं त्यांना घरं मिळावीत, यासाठी गृहनिर्माण विभागानं विचार करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
बीडीडी चाळीत सुमारे २हजार ९०० घरं ही पोलीस सेवा निवासस्थानं आहेत या पैकी ७०० पोलीस निवासस्थानं ही बीडीडी प्रकल्पात असतील, तर उर्वरित २२०० घरं ही माहिम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतीसाठी दिली जातील, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले गृहनिर्माणमंत्री डॉ. जीतेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.