राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती कोविंद प्रधानमंत्री राल्फ गोन्साल्विस आणि इतर मान्यवरांची भेट घेणार असून ते संसदेलाही संबोधित करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती अनेक करारांवर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा आहे.
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि भारत यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रकुल यासह विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर सक्रियपणे दोन्ही देश संवाद साधत असतात. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही भारत सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सशी जोडलेला आहे. भारतीय वंशाचे लोक १९ व्या शतकात या देशात आले होते. त्या व्यक्तींचे वंशज आता स्थानिक समुदायाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सेंट व्हिन्सेंटमध्ये १ जून हा भारतीय आगमन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे तर ७ ऑक्टोबर हा भारतीय वारसा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.