महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव
Ekach Dheya
पुणे : महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त संतोष पाटील, प्रकल्प संचालक शालीनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, महाअनुषाचे पंकज पाटील उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, महाअनुषा पोटर्लच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात पथदर्शी काम होईल. स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतर विकास उपक्रमांसोबत माझी वसुंधरा अभियानाचाही यामध्ये अंतर्भाव केला जावा. या अभियानात असलेल्या पाच घटकांचा अंतर्भाव करून काम केले तर पर्यावरण संवर्धनात चांगले योगदान देता येईल.
महाअनुषा पोर्टलचा पुणे महसूल विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. पाचही महानगरपालिकाना यामध्ये समावून घेतले जाणार असल्याचे सांगून कोरोना कालावधीत स्वयंसेवी संस्था व उद्योग समूहाने केलेल्या सहकार्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेलेल्या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. पुणे जिल्हयात ६० पेक्षा अधीक उद्योग संस्थांनी सामाजिक दायित्व निधीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आदर्श शाळा संकल्पना प्रभावीपणे राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महाअनुषाचे पाटील म्हणाले, सीएसआर निधी आणि प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी हे सयुंक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) विकसित केले गेलेले पोर्टल आहे. शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य सेवा केंद्रे सुधारण्यासाठी प्रकल्प अपलोड करण्यात आले आहेत. महाअनुषा पोर्टलवर लॉग इन करण्यास उद्योग समूहांचा चांगला प्रतिसाद असल्याचे ते म्हणाले.
कोरोना कालावधीत शासकीय यंत्रणांनी चांगले काम केले आहे, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही पथदर्शी कामे झालीत,अशा प्रतिक्रिया उद्योग समूहांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
यावेळी सीएसआरमध्ये सहभागी असलेल्या ६० उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक समूहाच्या प्रतिनिधीने त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली.
असे आहे महाअनुषा पोर्टल
महाअनुषा पोर्टलचा पुणे जिल्ह्यातील शासकीय विविध विभाग, स्वयंसेवी संस्था व उद्योगसमूह हे सर्व या पोर्टलचा वापर करतात. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जे प्रकल्प उभे करायचे असतील ते या पोर्टलवर अपलोड केले जातील. जे उद्योगसमूह त्यांचा सीएसआर निधी या प्रकल्पासाठी देणार आहेत, त्या उद्योगसमूहांना ही प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून पुर्ण करता येणार आहे. उद्योगसमूहाना त्यांनी ज्या प्रकल्पासाठी उद्योगसमूहाने निधी दिला त्या प्रकल्पांच्या प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण परिक्षण करता येणार आहे. सामान्य नागरिकांनाही कोणत्या उद्योगसमूहाने प्रकल्पासाठी किती मदत केली हे पाहता येणार आहे.