Site icon साप्ताहिक एकच ध्येय

द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

नवी दिल्ली : द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की भारत ही उत्सवांची भूमी आहे. आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीने देशाच्या काही भागांमध्ये नेहमीच कुठला ना कुठला उत्सव सुरुच असतो. भारतीय उत्सवांच्या निमित्ता आपण भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी साजऱ्या करतो. या उत्सवांमुळे आपल्याला विविध प्रकारच्या कला, संगीत, गीत आणि नृत्य यांची माहिती होते, असे ते म्हणाले.

भारत ही शक्ती साधनेची भूमी आहे. गेले नऊ दिवस आपण देवी मातेची पूजा केली असे सांगून, हीच भावना पुढे नेत त्यांनी सर्वांना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

मन की बात दरम्यान घरातल्या लक्ष्मी बाबत आपण बोलल्याचे स्मरण करुन देत पंतप्रधानांनी या दिवाळीत आपल्या नारी शक्तीचे कर्तृत्व साजरे करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आज विजयादशमी आहे आणि हवाई दल दिनही आहे. भारताला आपल्या हवाई दलाचा सार्थ अभिमान आहे.

महात्मा गांधींची 150वी जयंती निमित्त पंतप्रधानांनी आजच्या विजयादशमीला एक विनंती केली आहे. त्यांनी जनतेला यावर्षी एक मोहिम हाती घेऊन ती पूर्णत्वाला नेण्यासाठी काम करायला सांगितले. ही मोहिम कुठलीही असू शकते, उदाहणार्थ: अन्नाची नासाडी टाळणे, ऊर्जा संवर्धन, पाणी वाचवा इत्यादी. आपल्याला सामुहिक भावनेची ताकद समजून घ्यायची असेल, तर आपण भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

द्वारका श्री राम लीला सोसायटीने आयोजित केलेली रामलिला पंतप्रधानांनी पाहिली. या कार्यक्रमात दुष्टप्रवृत्तींवर सत्तप्रवृत्तींचा विजय अधोरेखित करणारे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या भव्य प्रतिकृतींच्या दहनालाही ते उपस्थित होते.

 

Exit mobile version