Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संपूर्ण भोसरीगाव एकवटले, विलास लांडे यांच्या विजयाचा भोसरीकरांचा निर्धार; प्रचाराचा नारळ फुटला

पिंपरी : भोसरीच्या विकासात माजी आमदार विलास लांडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भोसरीगावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भोसरीसह संपूर्ण मतदारसंघात झालेले विकास प्रकल्प विलास लांडे यांनीच पुढाकार घेऊन मार्गी लावले आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात भोसरीची काय परिस्थिती झाली हे सर्व जनता पाहत आहे. भोसरीच्या विकासासाठी विलास लांडे हेच योग्य उमेदवार आहेत. निवडणुकीत संपूर्ण भोसरीगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक विलास लांडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे निवडणुकीत विलास लांडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक पंडीत गवळी यांनी बुधवारी व्यक्त केला.

भोसरी, लांडेवाडी येथील तुळजा भवानी मंदिरात नारळ वाढवून कपबशी चिन्हावर अपक्ष लढणारे विलास लांडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भोसरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन त्यांनी घेतले. मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या सभेत माजी नगरसेवक पंडित गवळी बोलत होते. यावेळी अपक्ष उमेदवार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर हनुमंत भोसले, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, अजित गव्हाणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, अनुराधा गोफणे, काका लांडे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, विनायक रणसुभे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, मानव कांबळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भोसरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडीत गवळी म्हणाले, “विलास लांडे हे तरूणांना मागे घेऊन फिरणारे नेते नाही. तरूणांच्या हाताला काम देणारे आणि त्यांची घरे उभारणारे नेते आहेत. लांडे यांनी आमदार असताना भोसरीगावच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. भोसरीचा चेहरामोहरा बदलून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचे काम विलास लांडे यांनी केले. मात्र गेल्या पाच वर्षांत भोसरीचा हा विकास खुंटलेला आहे. या भागात एकही मोठे काम झालेले नाही. उलट भोसरीचा श्वास कोंडला गेला आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता विलास लांडे यांची गरज आहे. त्यामुळे लांडे यांच्या विजयासाठी भोसरीगाव त्यांच्या पाठीशी एकसंधपणे उभा राहिला आहे. पाच वर्षापूर्वी झालेली चूक भोसरीकर आता सुधारणार आहेत. लांडे यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्याचा चंग भोसरीकरांनी बांधला असल्याचे ते म्हणाले.”

विलास लांडे म्हणाले, “दत्ता साने आणि हनुमंत भोसले यांच्यासह मतदारसंघातील सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे निवडणुकीत माझी ताकद वाढलेली आहे. मी बहुजनांचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे. पाच वर्षांपूर्वी चुकीचा माणूस निवडून गेल्यामुळे मतदारसंघाची अवस्था बिकट बनली आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू आहे. टक्केवारी दिली तरच काम मिळते, अशी स्थिती आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याच्या नावाखाली १४० कोटी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली १५० कोटी उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेत पहाटेपर्यंत काम चालू ठेवून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरातील उद्योगधंदे, कंपन्या बंद पडू लागल्या आहेत. तरूणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असल्याचे लांडे यांनी सांगितले.”

माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले, “विलास लांडे यांना मी माझ्या नेहरूनगर भागातून मताधिक्य मिळवून देणार आहे. लांडे यांच्या विजयात नेहरूनगर हा भाग निर्णायकी ठरेल, असे आमचे काम सुरू आहे. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जमलेल्या या गर्दीने सुद्धा विलास लांडे हा माझा उमेदवार असल्याचे समजून आपापल्या भागातून त्यांना मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.”

संदिपान झोंबाडे म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली हुकुमशाही संपविण्यासाठी आपण सर्वांनी विलास लांडे यांना मतदान केले पाहिजे. केंद्र, राज्य असो की महापालिकेतील भाजपच्या सत्ताधीशांना केवळ लुटण्याचा कारभार करता येतो. त्यांना सर्वसामान्यांशी काहीही देणे घेणे नाही. भोसीर मतदारसंघात दहशत, गुंडगिरी आणि केवळ वसुलीचे काम सुरु आहे. दुसऱ्याचे बोट धरून आलेले आता शहाणपणा करत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी खूप काही करूनही त्याची जाण त्यांनी ठेवली नाही. आता आपली वेळ आली आहे. मतदानादिवशी कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून जनतेने विलास लांडे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version