बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
Ekach Dheya
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.
उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.