गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर – प्रधानमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बायो टेक -स्टार्टअप एक्स्पो-२०२२ चं उदघाटन करताना बोलत होते.
जैव तंत्रज्ञानाच्या जागतिक परिसंस्थेमधल्या पहिल्या १० देशांच्या संघापासून भारत फार दूर नसून गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी जगभरात महत्व संपादन केल्याचं ते म्हणाले. यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून पुढील २५ वर्षांच्या प्रगतीला गती देण्यात जैव-तंत्रज्ञान क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांच्या विकासाच्या केंद्रस्थानी असून भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात सरकारने केलेल्या गुंतवणुकीमुळे जैव-तंत्रज्ञान क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं ते म्हणाले. एक्स्पो हा उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातले नेते, वैज्ञानिक, संशोधक, उत्पादक, नियामक सरकारी अधिकारी आणि अन्य घटकांना एकत्र आणणारं व्यासपीठ ठरेल असं ते यावेळी म्हणाले.