७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना आवाहन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या खरीपपूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद झाली. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधे मृग नक्षत्राचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी पेरणीलासुद्धा सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादन क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकारनं हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती धीरज कुमार यांनी दिली.