हिमाचल प्रदेश इथं मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला प्रधानमंत्री संबोधित करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशामधील धर्मशाळा इथं मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. धर्मशाळा इथं पोहोचताच प्रधानमंत्री प्रथम रोड शोमध्ये सहभागी होणार असून त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर देखील उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी राज्यातले विविध सांस्कृतिक लोकसमूह नियोजित सादरीकरण करणार आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोदी यांच्या दौऱ्याचा सविस्तर आढावा घेत योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसह विविध क्षेत्रातील सुमारे २०० विषयतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. केंद्र आणि राज्यांच्या भागीदारीत जलद आणि शाश्वत आर्थिक विकासावर या परिषदेत विशेष भर देण्यात येणार असून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शहरी प्रशासन, पीक वैविध्य आणि कृषी मालाचं स्वावलंबन या विषयांवर देखील या दरम्यान चर्चा होणार आहे. कॅबिनेट सचिव, राजीव गौबा यांनी काल संध्याकाळी नीती आयोगानं आयोजित केलेल्या या परिषदेचं उद्घाटन केलं तसंच उद्या या परिषदेचा समारोप पार पडणार आहे.