अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावलं उचलली जात असून त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. अल्पसंख्याक समुदायातल्या युवकांसाठी वसतीगृहं उभारली जातील, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातही जैन समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल. जैन अल्पसंख्यांक समुदायाला कर्नाटक राज्यात दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींच्या धर्तीवर महाराष्ट्रात सवलती देण्यासंदर्भात अभ्यास केला जाईल, असंही पवार यांनी सांगितलं. यावेळी अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ, तसंच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वरीष्ठ सरकारी अधिकारी, आणि जैन समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.