Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर जात असून, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. जर्मनीत स्क्लॉस एलमो इथं उद्या आणि परवा भरणाऱ्या जी-7 राष्ट्रांच्या परिषदेला ते भेट देतील.

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि अमेरिका या सात देशांच्या या संघटनेच्या परिषदेचं यजमानपद भूषवणाऱ्या जर्मनीने मोदी यांना खास आमंत्रण दिलं आहे. या परिषदेच्या निमित्तानं आलेल्या इतर राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी देखील मोदी द्विपक्षीय चर्चा करतील.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं की भारताखेरीज अर्जेंटीना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या देशांनाही जर्मनीनं आमंत्रित केलं आहे.

प्रधानमंत्री मोदी सोमवारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पहिलं सत्र हवामान बदल, ऊर्जा, आरोग्य या विषयांवर असून, दुसरं सत्र अन्न सुरक्षा आणि लिंग भेद विरोध या विषयावर होणार आहे. जर्मनीतल्या भारतीय समुदायाशी मोदी संवाद साधतील.

Exit mobile version