Site icon साप्ताहिक एकच ध्येय

समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी यासाठी विशेष कायदेविषयक शिबिराचे जिल्हा न्यायालयात आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल दिपक कश्यप, प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी गजानन कुलकर्णी, ॲड. यशपाल पुरोहीत आदी उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. देशमुख यांनी एलजीबीटी समुहाच्या समस्येवर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना विविध कायद्यामध्ये कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

श्रीमती कश्यप म्हणाल्या, विधी सेवा प्राधिकरणातर्फे एलजीबीटी समुहाच्या हक्कासाठीची चळवळ संयुक्त राष्ट्राच्या स्टोनवाल उठावातून सुरु झाली. या समुहासाठी सार्वजनिक स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी तसेच त्यांना आधार कार्ड आणि ओळखपत्रासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

श्री. कुलकर्णी यांनी एलजीबीटी समुहासंदर्भात असणाऱ्या कायद्यामधील तरतुदी तर ॲड. पुरोहीत यांनी एलजीबीटी समुहाबाबत असलेल्या न्यायालयीन आदेशाबाबत माहिती दिली.

एलजीबीटी समुहाच्या संवादासाठीचा जनजागृतीपर कार्यक्रम राज्यामध्ये पहिल्यांदाच पुणे विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील एलजीबीटी समुहासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थाचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. सचिन राऊत तर समारोप ॲड. यशपाल पुरोहित यांनी केले.

Exit mobile version