Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा आधिकार मतदारांनी देण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची एक संधी मतदारांना मिळाली पाहिजे, त्यादृष्टीनं निवडणूक आयोगानं मतदारांना हा आधिकार देण्याची वेळ आली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत सेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सध्या लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. तो टिकवण्यासाठी लोकशाहीच्या चारही खांबांनी पुढं आलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यातल्या सत्तांतराबाबत ते म्हणाले की भाजपानं काल जे केलं तेच आम्ही अडीच वर्षापूर्वी बोलत होतो. त्यावेळी ते मान्य केलं असतं, तर काल जे झालं ते सन्मानानं झालं असतं. त्यावेळी नकार देऊन आता पाठीत खंजीर खुपसून भाजपानं काय साधलं असा सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसैनिक मुख्यमंत्री, असं होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. नव्या सरकारचं अभिनंदन करत त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत असं त्यांनी सांगितलं. नव्या सरकारकडून जनतेचं भलं व्हावं, असं ते म्हणाले. मेट्रो कारशेड आरेच्या जंगलात उभारण्याचा निर्णय नव्या सरकारनं रेटू नये, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. सरकारचा हा निर्णय दु:खदायक आहे. आरेच्या जंगलातल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली तर त्यातलं संपूर्ण वन्यजीवन धोक्यात येईल. त्यामुळे आरे ऐवजी कांजुरमार्गचा पर्याय चांगला आहे, त्याचा विचार करावा असं ते म्हणाले.

Exit mobile version