Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पालखी मार्गावरील गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त

पालखी वारी निर्मलहागणदारीमुक्तआरोग्यदायी व पर्यावरणयुक्त

पुणे : पालखी दरम्यान  स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार पालखी मार्गावरील  गावांमध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने कचराकुंड्या, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी केल्यामुळे वारी ‘निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त’ झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने पालखी मार्गावरील गावांना पालखीपूर्वी परिसर स्वच्छ करण्यासोबतच गावात, रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या कचराकुंडी उभारण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता करण्यासोबत विविध ठिकाणी तात्पुरत्या कचरा कुंड्यांची सुविधा करण्यात आली. गावात सरासरी २० ते २५ ठिकाणी कचराकुंडीची सुविधा करण्यात आली. वारकऱ्यांनी कचरा कुंडीचा उपयोग केल्याने व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता राखल्याने पालखी गावातून गेल्यावर गावे पूर्वीसारखी स्वच्छ आहेत.

पालखी पूर्वी ४८ टन सुका व १३७ टन ओला असा १८५ टन कचरा संकलित करण्यात आला. पालखीनंतर २५ टन सुका व १२८ टन ओला असे १५३ टन कचरा संकलन करण्यात आले.  प्रत्येक गावातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावाची स्वच्छता केली. जमा झालेला ओला कचरा खत प्रक्रीयेसाठी व सुका कचरा स्थानिक भंगार विक्रेते यांनी घेतला आहे.

पालखी दरम्यान मुक्काम गावात भाडेतत्वावर शौचालये उभारणी केली असली तरी विसावा व मार्गावरच्या गावात व रस्तेच्या कडेला मात्र तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. जेष्ठ वारकरी व विशेषत: महिला वारकरी यांची त्यामुळे व्यवस्था झाली. पालखी मार्गावरील सर्व गावात ठराविक अंतरावर तात्पुरते स्वच्छतागृहाची उभारणी केल्याने गावात हागणदारीमुक्तीसाठी सातत्य ठेवण्यास हातभार लागला आहे. याचे स्वच्छ भारत मिशन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी सनियंत्रण करत आहेत.

“गेल्या पाच ते सहा वर्षापासून जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता, पाणी, शौचालय, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने ग्रामस्थांना पालखीतील वारकऱ्यांची सेवा करण्यास आनंद होत आहे.” – तुकाराम दोरगे, ग्रामस्थ, दोरगेवाडी यवत

“आम्ही ४५ वर्षापासून पालखी समवेत आहोत. सुरुवातीला ३५ वारकरी होते आज ६०० वारकरी आहेत.  दिंड्यांजवळ शौचालय सुविधा उपलब्ध असल्याने आम्हा वारकऱ्यांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध आहे. शासन केवळ एकाच गावात नाही तर पुणे पासून पंढरपूर पर्यंत ही सेवा देत आहे. त्यामुळे वारी निर्मल, स्वच्छ, आनंदवारी आहे.” – सोपान देवराम खांदवे, अध्यक्ष, श्री क्षेत्र प्रासादीक दिंडी, लोहगाव

“आज शासनाने जागोजागी शौचालय, कचराकुंडी, व स्नानगृह उभारल्यामुळे महिलांची उत्तम व्यवस्था होते आहे पूर्वीसारखी गैरसोय होत नाही.”- श्रीमती शैला शिर्के, पिपंळगाव बसवंत, नाशिक

“पालखी २०२२ मध्ये पालखी मुक्काम व विसावा गावात पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. गावात वेळेत पायाभुत सेवा सुविधा निर्माण झाल्या व वारकऱ्यांना चांगली सेवा देता येत आहे. स्थानिक अधिकारी व कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडून उत्तम सेवा देत आहेत.” – मिलींद टोणपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

“जिल्हा प्रशासनाकडून यावर्षी वारकऱ्यांना शौचालय, स्वच्छता, स्नानगृह, आरोग्य, पाणी पुरवठा हेल्पलाईन, तज्ञ डॉक्टर, रस्ते अशा विविध अत्यावश्यक सेवा उपलब्ध केल्या आहेत.  शासनाकडून वारकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देत असल्याने यावर्षी पालखी वारी निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त वारी झाली आहे.” – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,पुणे

Exit mobile version