चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते. जो देश बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत नाही, तो देश मागं पडतो, तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भारताला याचा फटका बसला. मात्र, आज डिजिटल इंडिया मोहिमेच्या रुपानं संपूर्ण मानव जातीसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतीकारक असू शकतो, याचं उदाहरण भारतानं निर्माण केलं आहे, असं ते म्हणाले. डिजिटल गव्हर्नन्स योजनांचा देशातल्या गरिबांना सर्वाधिक फायदा झाला आहे, जनतेला सक्षम बनवण्याचं काम या योजनांनी केलं आहे, असं त्यांनी सांगितलं आजचा कार्यक्रम ही आधुनिक भारताची झलक आहे, असं ते म्हणाले.
बदलत्या काळानुसार डिजिटल इंडियाचा नव्यानं विस्तार झाला आहे, आपलं जीवन त्यामुळे सोपं झालं आहे, भ्रष्टाचार, लाचलुचपत, मध्यस्थ यांचं पूर्वी असलेलं राज्य यामुळे नामशेष झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. डिजिटल इंडिया योजनांमुळे गरीब आणि मध्यम वर्गाचा वेळ वाचत असल्यानं त्यांची बचतही वाढली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. इंटरनेट आणि इतर डिजिटल सेवा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणाऱ्या ‘डिजिटल इंडिया भाषिनी ‘चा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. डिजिटल इंडिया जेनेसिस या स्टार्ट अप प्लॅटफॉर्मची सुरुवात त्यांनी केली या प्लॅटफॉर्मसाठी ७५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.