Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार

स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह पुणे स्मार्ट सिटीने संयुक्त विजेतेपद मिळविले. पुणे स्मार्ट सिटीच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन पुरस्कारांवर पुणे शहराने बाजी मारली आहे.

राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 22 ते 24 मे 201 9 या दरम्यान नुकत्याच संपन्न झालेल्या स्मार्ट सिटी एक्सपो 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये पुणे स्मार्ट सिटीला विजेते घोषित करण्यात आले. या पुरस्कार श्रेण्यांसाठी देशभरातील वेगवेगळ्या भागांतील अनेक शहरांची नामांकने करण्यात आली होती.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ​मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे सचिव श्री. परमेश्वरम अय्यर यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारले.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी या पुरस्कारांबद्दल बोलताना सांगितले की, “नागरिकांना सहभागी करून घेत डेटा आणि तंत्रज्ञान प्रणित नवकल्पनांची अंमलबजावणी करण्यात पुणे स्मार्ट सिटीने निरंतर प्रयत्न केले असून, भारतातील अग्रगण्य स्मार्ट सिटींमध्ये पुण्याने स्थान मिळविले आहे. या प्रयत्नांना या पुरस्कारांमुळे मान्यता मिळाली आहे.”

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील अनेक वरिष्ठ मान्यवरांच्या निवड समितीने कला, संस्कृती याबरोबरच विविध उपक्रमांद्वारे पुण्यातील डेटा व तंत्रज्ञानावर आधारित नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या सर्वसमावेशक प्रयत्नांना मान्यता दिली. पुणे स्मार्ट सिटीची उपकंपनी पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशनच्या (पिफ) वतीने भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संस्थांच्या सहयोगाने डेटाप्रणित उपक्रम राबविण्यात येतात.

पुणे स्मार्ट सिटीबद्दल…

अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा, प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीने पटकावले.

Exit mobile version